Market Rate | सोयाबीनच्या दरात सुधारणा! शेतकऱ्यांनो जाणून घ्या कापूस, मका, तुरी आणि आले यांचे बाजारभाव
Market Rate | कापूस: देशातील बाजारात कापसाच्या भावात चढ उतार कायम आहेत. सीसीआयने कापूस खंडीचे भाव कमी केल्याने बाजारावर (Market Rate) दबाव येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस भाव आता काहीसे स्थिरावले आहेत. सध्या कापूस ८२.८९ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान आहे. देशातील वायदे ६१ हजार रुपये प्रतिखंडीवर आहेत. बाजार समित्यांमधील कापसाची आवकही घटली आहे. बाजारातील कापूस भावपातळी ७ हजार ३०० ते ७ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. कापूस बाजारात आणखी काही दिवस ही परिस्थिती कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
सोयाबीन: देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरुच आहेत. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खरेदीचे भाव आजही ५० रुपयांनी वाढवले होते. सध्या प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ८०० ते ४ हजार ९५० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील आवक दिवसेंदिवस कमी होत आहे. याचाही आधार सोयाबीनला मिळत आहे. सोयाबीनचे भाव बाजार समित्यांमध्ये ४ हजार ४०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन भावातील चढ उतार कायम आहेत. सोयाबीन बाजारात आणखी काहीशी वाढ अपेक्षित आहे, असे सोयाबीन बाजारातील अभ्यासकांन सांगितले.
वाचा: दूध उत्पादकांसाठी गोड बातमी! 52 हजार 951 उत्पादकांच्या खात्यावर तब्बल 6 कोटी 8 लाखांचे अनुदान जमा
मका: देशात मक्याचा चांगला उठाव आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे. सध्या पोल्ट्रीलाही चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे पोल्ट्रीकडून मक्याला मागणी आहे. तसेच स्टार्च उद्योगाचीही खरेदी सुरुच आहे. त्यामुळे मक्याला २ हजार ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
तुरी: तुरीच्या भावातील तेजी कायम आहे. वाढती मागणी आणि घटलेला पुरवठा, याचा दरावर परिणाम दिसून आला असून वाढ कायम आहे. देशातील महत्वाच्या बाजारात तुरीचा सरासरी ११ हजारांच्या दरम्यान आला. तर देशभरातील बाजारातील सरासरी भाव १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. बाजारातील घटती आवक आणि चांगला उठाव यामुळे तुरीच्या बाजारात सुधारणा दिसून आली. तसेच, तुरीच्या भावातील तेजी कायम राहील, असाही अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
हेही वाचा: शेतकऱ्यांनो तुम्हालाही कर्ज घ्यायचंय का? बँक ऑफ इंडियाकडून मिळतय तब्बल 25 लाखांच कर्ज, पाहा कागदपत्रे
आले: आल्याचा भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसत आहे. बाजारातील आल्याची आवक कमी झाल्यानंतर आल्याच्या भावात सुधार दिसण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.