ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

नैसर्गिक व जैविक कीड व रोग नियंत्रण महत्वाचे..

जैविक नियंत्रण पध्दतीत परोपजीवी आणि परभक्षी कीटकांद्वारे हानीकारक किडींचे नियंत्रण केल्यामुळे कोणतेही अनिष्ट परिणाम न होता हमखास कीड नियंत्रण होते. अंडीनाशक परोपजीवी कीटकामुळे पिकांचे नुकसान प्रारंभिक अवस्थेतच टळते. त्यामुळे अशा परोपजीवी कीटकांचा वापर विशेष फायदेशीर आहे. ट्रायकोग्रामा हा त्यापैकीच एक महत्वाचा परोपजीवी मित्रकीटक आहे. ट्रायकोग्रामा हा अतिशय लहान आकाराचा गांधीलमाशीच्या वर्गातील कीटक त्याची प्रौढ माशी काळसर रंगाची असते. या मित्रकीटकाची मादीमाशी इतर कीटकांची अंडी शोधून त्यात आपली अंडी घालते. अंडी, अळी, कोष व प्रौढ अशा चार अवस्थेतून तिचा जीवनक्रम पूर्ण करते.

कोषावस्थेपर्यंतच्या सर्व अवस्था किडीच्या अंड्यांमध्येच पूर्ण होत असल्यामुळे त्या अवस्थांची हालचाल निदर्शनास येत नाही. असून ट्रायकोग्रामा कीटक मोठ्या प्रमाणात शेतामध्ये सोडले असता हानीकारक किडींनी घातलेली अंडी शोधून त्यात अंडी घालतात. हानीकारक किडीच्या अंड्यामध्ये ट्रायकोग्रामाची अळी जगते. त्यामुळे हानीकारक किडीचे अंडी अवस्थेतच प्रभावीपणे नियंत्रण होते. तसेच ट्रायकोग्रामाचा जीवनक्रम पूर्ण झाल्यामुळे त्याची शेतीतील वाढते आणि अंडीनाशक परोपजीवी म्हणून पुन्हा कार्यक्षम होते.

ट्रायकोग्रामाच्या प्रमुख प्रजातीमध्ये ट्रायकोग्रामा चिलोनीस व ट्रायकोग्रामा जॅपोनिकम ही खोडकिड्यासाठी उपयुक्त आहेत. ट्रायकोग्रामा ब्राझीलिएन्सीस फळ पोखरणाऱ्या अळीसाठी आणि ट्रायकोग्रामा अकई पाने खाणाऱ्या अळीसाठी उपयुक्त आहेत.

परभक्षी किंवा परजीवी कीटकांमध्ये क्रायसोपा अतिशय उपयोगी आहे. या मित्रकिडीला ‘ग्रीन लेस विंग’ असे देखील म्हणतात. भारतात क्रायसोपाच्या ६५ प्रजाती विविध पिकांमध्ये नैसर्गिकरित्या आढळून येतात. त्यापैकी क्रायसोपली कायर्नीया आणि मॅलाडा बोनीनेसीस या महत्वाच्या उपयुक्त प्रजाती आहेत. क्रायसोपाची अळी मावा, तुडतुडे, फुलकिडे, कोळी, पिठ्या ढेकूण इ. अनेक रस शोषणाऱ्या किडींवर तसेच पतंगवर्गीय किडीची अंडी व पहिली अळी अवस्था इ. किडींचे भक्षण करतात. या क्रायसोपाच्या अळ्यांना मोठ्या नांग्यासारखे दोन दात असतात. ज्याद्वारे किडींना घट्ट पकडून ठेवता येते व क्रायसोपाची अळी किडीच्या शरीरातील रस शोषून घेते. त्यामुळे कीड मरते. तसेच स्वसंरक्षणासाठी खाल्लेल्या किडीच्या उरलेल्य अवशेषांचे कवच तयार करून त्यात सदैव रहाते.

क्रायसोपा मादी पतंगाचे सरासरी आयुष्य३०-३५ दिवसांचे तर नराचे २५-३० दिवसांचे असते. याकाळात क्रायसोपा मादी पतंग शेतभर फिरून जिथे जिथे हानीकारक किडीचा प्रादुर्भाव आहे किंवा लगेच होणार असेल तिथे तिथे आपली अंडी टाकून त्यातून अळी निघून संबंधित किडीचे नियंत्रण करते. ट्रायकोडर्मा ही एक परोपजीवी बुरशी असून पिकांना रोगग्रस्त करणाऱ्या जमिनीतीलbविविध प्रकारच्या बुरशीवर आपली उपजीविका करून त्यांना नष्ट करते.

तिचा उपयोग जमिनीत पिकांना रोगग्रस्त करणाऱ्या पिथीयम, फायटोप्थोरा, रायझोक्टोनिया, फ्युजॅरीयम, स्केलोशियम -इ. बुरशीद्वारे पिकांना होणाऱ्या वेगवेगळ्या रोगांचे नियंत्रण करण्यासाठी होते. ट्रायकोडर्मा या बुरशीच्या व्हिरीडी, हार्नियानम, हॅमटन, रेजीएम, पॉली स्पोरम व मॅक्सिमा अशा सहा प्रजाती आहेत. परंतु त्यापैकी प्रयोगाच्या निष्कर्षावरून व्हिरीडी आणि हार्जियानम या दोन प्रजातीचा वापर फारच परिणामकारक आढळून आला. या बुरशीचा उपयोग रोगप्रक्रियेसाठी, माती निर्जंतुकीकरणासाठी तसेच वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी अतिशय उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे.

कारण या बुरशीची वाढ हानीकारक बुरशीपेक्षा लवकर होत असल्यामुळे हानीकारक बुरशी तंतू पूर्णपणे झाकले जाऊन त्याची वाढ खुंटते.. हानीकारक बुरशीच्या तंतूभोवती ट्रायकोडर्मा बुरशीचे तंतू गुंडाळले जातात व शेवटी हानीकारक बुरशीच्या तंतूमध्ये शिरतात. अशा प्रकारे हानीकारक बुरशींचा पूर्ण बंदोबस्त होतो. ट्रायकोडर्मा रोपांच्या पातळ थरात वाढते. त्यामुळे हानीकारक बुरशींचे तंतू मुळामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. यापासून ग्लिओटॉक्सिन व व्हिरीडीन नावाची दोन विषारी द्रव्ये तयार होऊन हानीकारक बुरशीच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होऊन रोग नियंत्रण होते. ही बुरशी हानीकारक बुरशी होऊन अन्नद्रव्यासाठी स्पर्धा करून हानीकारक बुरशीला होणाऱ्या अन्नाचा पुरवठा कमी करते व तिच्या वाढीवर नियंत्रण ठेवते.

ट्रायकोडर्मा सेंद्रिय पदार्थाच्या कुजण्याच्या क्रियेस मदत करते. पिकांच्या जोमदार वाढीस पडतील असे पदार्थ ही बुरशी तयार करते. याशिवाय सूत्रकृमींचे नियंत्रण करते.

फळे पोखरणाऱ्या अळ्यांचे नियंत्रण करण्यासाठी जैविक कीटकनाशकांत बॅसिलस थुरीनाजिएन्सिस या जिवाणूचा आणि न्युक्लीअर पॉलीहायड्रोसिस या विषाणूंचा प्रामुख्याने समावेश होतो. हेलिऑथिस (घाटे अळी) च्या नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही. (न्युक्लीअर पॉलीहैड्रोसिस) या जैविक विषाणू कीड व्यवस्थापनास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. घाटे अळी विषाणू हे जैविक कीडनाशक घाटे अळी विषाणू कणांचे पाण्यातील द्रावण आहे. हे फक्त घाटेअळीलाच अपायकारक आहे. या जैविक कीडनाशकाचा वापर रासायनिक कीडनाशकाप्रमाणे फवारणी तंत्राद्वारे करता येतो. तसेच आवश्यकतेप्रमाणे रासायनिक कीडनाशकासोबत अथवा आलटून पालटून या जैविक कीडनाशकाचा वापर करावा लागल्या काही अपाय होत नाही.

या विषाणूचा परिणाम खाल्लेल्या अन्नाद्वारे हे विषाणूकण अळीच्या पोटात जातात. अळीच्या शरीरात या विषाणूची झपाट्याने वाढ होऊन अळ्या व्हायरोसिस या रोगाने ग्रस्त होतात. रोगग्रस्त अळ्यांचे खाणे मंदावते, त्या सुस्त होतात. त्यांचा रंग पांढुरका निस्तेज होऊन ४-७ दिवसांत त्या लिबलिबोत, ठिसूळ होऊन पूर्णतः रोगग्रस्त होतात आणि मरतात.कधी कधी पुर्णतः रोगग्रस्त झालेल्या अळीच्या संपर्क जेव्हा दूसरीअळी येते आणि मेलेल्या अळीला चाटते तेव्हा दुसरी निरोगी अळी सुद्धा रोगग्रस्त होते असे चक्र नैसर्गिक रित्या चालू असते…… धन्यवाद

Save the soil all together
मिलिंद जि गोदे
(सेंद्रिय शेती अभ्यासक)
युवा शेतकरी
[email protected]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button