Marriage | वयाच्या ९३ व्या वर्षी पाचव्यांदा लग्नबंधनात! मीडिया सम्राट रुपर्ट मर्डोकची अजूनही तृप्ती का?
Marriage | लंडन, ४ जून २०२४: ९३ वर्षीय मीडिया सम्राट रुपर्ट मर्डोक यांनी शनिवारी ६३ वर्षीय एलेना झुकोवा यांच्याशी लग्न करून पाचव्यांदा बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला आहे. एलेना या निवृत्त मरिन बायोलॉजिस्ट आहेत.
रॉयटर्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
रिपोर्टनुसार, मर्डोक आणि एलेना गेल्या एक वर्षापासून डेट करत होते. मर्डोक यांची तिसरी पत्नी वेंडी डेंग यांच्या माध्यमातून एलेना यांची ओळख झाली होती. एलेना यांच्या मुलीचं लग्न काही महिन्यांपूर्वीच रशियातील एका प्रतिष्ठित राजकीय नेत्यासोबत झाले आहे.
मर्डोक यांनी यापूर्वी चार लग्ने केली आहेत. त्यांचे पहिले लग्न १९५६ मध्ये झाले होते, परंतु मतभेदांमुळे ११ वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. यानंतर १९६० मध्ये त्यांनी दुसरे लग्न केले आणि या लग्नातून त्यांना तीन मुले झाली. १९९९ मध्ये तिसऱ्या पत्नी वेंडी डेंग यांच्यासोबत लग्न केले आणि २०१३ मध्ये घटस्फोट झाला. डेंग कडून त्यांना दोन मुले आहेत. त्यानंतर चौथा विवाह २०१६ मध्ये अभिनेत्री आणि मॉडेल जेरी हॉल यांच्यासोबत झाला, परंतु सहा वर्षानंतर २०२२ मध्ये यांचाही घटस्फोट झाला.
मार्च २०२३ मध्ये माजी निवृत्त पोलीस अधिकारी अॅन लेसली स्मिथ यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु काही कारणांमुळे लग्न रद्द करण्यात आले.
इलेना या रशियामधून अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाल्या आहेत आणि यापूर्वी अब्जाधीश उर्जा गुंतवणुकदार अलेक्झांडर झुकोव यांच्याशी विवाहबद्ध होत्या.
मर्डोक हे मागील वर्षी न्यूज कॉर्प आणि फॉक्सच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झाले होते. तब्बल सात दशकानंतर त्यांनी कारकीर्द थांबवली होती.