Lok Sabha elections |लोकसभा निवडणुका २०२४: राजू शेट्टींचा पराभव; भावनिक पोस्ट करून दिली प्रतिक्रिया…
Lok Sabha elections | लोकसभा निवडणुकांचे सर्व निकाल हाती आले असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अनेक ठिकाणी बाजी मारल्याचं चित्र आहे. महायुतीला जोरदार फटका बसल्याचं दिसून आलं आहे. विशेषतः हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते धैर्यशील माने यांनी या ठिकाणी विजय मिळवला आहे. माने यांनी सत्यजीत पाटील यांना फक्त १३,४२६ मतांनी पराभूत केलं. माने यांना एकूण ५,२०,१९० मते मिळाली, तर सत्यजीत पाटील यांना ५,०६,७६४ मते मिळाली. राजू शेट्टींना मात्र १,७९,८५० मते मिळाली आणि त्यांचा पराभव तब्बल ३,४०,००० मतांनी झाला आहे.
वाचा :River Project |सिन्नर तालुक्यासाठी १३ हजार २५० कोटींचा नदीजोड प्रकल्प: दुष्काळग्रस्त भागावर पाऊस!
पराभवानंतर राजू शेट्टी यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “माझं काय चुकलं! प्रामाणिक असणे हा गुन्हा आहे का? शेतकऱ्यांनो तुम्हीही…” अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. या पोस्टमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे
राजू शेट्टी यांनी निवडणुकीपूर्वी विजयाचा दावा केला होता आणि सामान्य शेतकरी आणि कष्टकरी वर्ग माझ्या पाठीशी असल्याचं म्हटलं होतं. मात्र, हातकणंगलेतील जनतेनं धैर्यशील माने यांनाच विजयाचा कौल दिला. या निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातील तिरंगी लढतीत माने आणि पाटील यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. शेवटी, धैर्यशील माने हे विजयी ठरले.