भुईमूग (Groundnut) हे तेलबिया (Oilseeds) पिकामध्ये महत्त्वाचे पिक असुन खरीपात या पिकाखाली महाराष्ट्रात २.३६ लाख हे क्षेत्र असुन त्यापासुन २.५७ लाख टन उत्पादन आणि उत्पादकता १०८२ किं./हे एवढी मिळाली. उन्हाळी हंगामात हे पिक ०.८२४ लाख हे क्षेत्रावर घेतले होते व त्यापासून १.१९६ लाख टन उत्पादन मिळाले आणि उत्पादकता १४५१ किं./हे अशी होती.
जमीन (Land)
मध्यम,भुसभुशीत चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.
पूर्व मशागत (Pre-cultivation)
एक नांगरट व दोन-तीन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.
बियाणे (Seeds)
भुईमूगाचे वाणनिहाय बियाणे प्रति हेक्टरी खालीलप्रमाणे वापरावे.
१०० किलो : एसबी – ११, टीएजी – २४, टीजी – २६, जेएल – ५०१, फुले ६०२१ , १२० ते १२५ किलो फुले प्रगती, फुले व्यास, टीपीजी – ४१, फुले उनप, फुले उन्नती
बीजप्रक्रीया (Seeding)
बियाण्यापासून प्रादुर्भाव होणा-या व रोपावस्थेत येणा-या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम थायरम किंवा २ ग्रॅम कार्बन्डेंझिम किंवा ३ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक चोळावे. नंतर एक किलो बियाण्यास २५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक चोळावे बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकून पेरावे.
पेरणी अंतर (Sowing )
दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व दोन रोपातील अंतर १० सें.मी ठेवावे. उन्हाळी हंगामात जमीन ओलवून नंतर वापशावर पाभरीने अथवा टोकण पध्दतीने पेरणी केल्यास बियाणे कमी लागुन उगवण चांगली होते.
आंतरपिके (Intercropping)
खरीप भुईमूग पिकात सोयाबीन, सूर्यफुल, तीळ, मूग, उडीद, तूर ही आंतरपिके ६: २ या प्रमाणात भुईमूग + ज्वारी १:१ तर कपाशी १:१ या प्रमाणात घ्यावी. आंतरपिकांमुळे अधिक आर्थिक फायदा होत असल्याचे प्रयोगाअंती दिसून आलेले आहे. भुईमूग + सोयाबीन (४:१) आणि कडेने एरंडीची लागवड (दोन ओळी) केल्यास पाने खाणारी अळीचे नियंत्रणास मदत होते. सुरु उसात उपट्या भुईमूग वाणाची आंतरपिक म्हणून लागवड करण्यासाठी ९० सें.मी. अंतरावर स-या पडून ऊसाची लागवड केल्यानंतर एक आठवड्याने १० सें.मी. अंतरावर सरीच्या दोन्ही बाजूस उन्हाळी भुईमूगाची लागवड करावी.
खत मात्रा (Fertilizer quantity)
पुर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रति हेक्टरी २० गाड्या कंपोस्ट किंवा चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. पेरणीच्या वेळेस २५ किलो नत्र + ५० किलो स्फुरद द्यावे. खत व्यवस्थापन (सुधारित शिफारशीनुसार २०१३) भुईमूगाच्या अधिक उत्पादनासाठी रासायनिक खत मात्रे सोबत जिप्सम ४०० क्वि/हे (२०० क्विं/हे पेरणीवेळी तर उर्वरीत २०० क्विं/हे आ-या सुटतांना) जमिनीत मिसळुन द्यावे. उन्हाळी भुईमूगासाठी नत्र व स्फुरद बरोबर २५० किलो जिप्सम १.२५ किलो पेरणीवेळी व १२५ किलो आ-या सुटण्याच्या वेळी) द्यावे.
आंतरमशागत (Intercropping)
पेरणीनंतर नांगे आढळून आल्यास बी टोकून ते ताबडतोब भरावेत. १० ते १२ दिवसांच्या अंतराने २ ते ३ कोळपण्या कराव्यात व २ निंदण्या (खुरपण्या) द्याव्या. शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी त्यामुळे पिकास मातीची भर मिळते. भुईमूगाच्या आ-या जमिनीत जाण्यास सुरुवात झाल्यावर आंतरमशागत करु नये. भुईमुगातील कार्यक्षम तण व्यवस्थापनाकरिता पेरणीनंतर लगेच पेंडीमिथॉलिन १.०० किलो क्रि. हा प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातुन ओलीवर फवारणी करावी. तसेच पेरणीनंतर तणांच्या बंदोबस्तासाठी २०-२५ दिवसांनी इमॅझिथायपर १० टक्के एस एल ०.०७५ कि.क्रि. हा/हे. (७५० मिली व्यापारी उत्पादन/हे) ५०० लिटर पाण्यातून द्यावे.
पाणी व्यवस्थापन (Water management)
खरीप भुईमूगास फुले येण्याची अवस्था (पेरणीनंतर २० ते ३० दिवस)., आ-या सुटण्याची अवस्था (४० ते ४५ दिवस) आणि शेंगा पोसण्याची अवस्था (६५ ते ७० दिवस) या अवस्थांमध्ये पावसाने ताण दिल्यास संरक्षित पाण्याची पाळी द्यावी. भुईमूग पेरणीनंतर ४-५ दिवसांनी एक पाणी(आंबवणी) द्यावे, म्हणजे राहीलेले बियाणे उगवून येईल. नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसाचे अंतराने १० ते १२ वेळा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आ-या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देवू नये.
पीक सरंक्षण (Crop protection)
फुलकिडे, तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी १० मिली किंवा ८ मिली, डिमॅटोन १५ टक्के प्रवाही औषध १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आणि पाने खाणारी अळी व पाने गुंडाळणारी अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रीन २० इ.सी ४ मिली किंवा डेकामेथ्रीन २८ इ.सीय १० मिली किंवा किनॉसफॉस २५ इ.सी. २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे. टिक्का व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब (डायथेन एम-४५) १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
काढणी व उत्पादन
पीक तयार झाले म्हणजे पाने पिवळी पडू लागतात. शेंगाचे टरफल टणक बनते व शेंगाच्या टरफलाची आतील बाजू काळी दिसू लागते. अशा प्रकारे पीक तयार झाल्यावर काढणी वरील तंत्रज्ञानाचा वापर केल्यास खरीपात सरासरी १८ ते २० क्विंटल/हेक्टर तर उन्हाळी भुईमूगाचे २५ ते ३० क्विंटल/हेक्टर उत्पादन मिळू शकते.
(महा. शासन)
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा:
1. ‘ट्रॅक्टर अनुदान योजनेचा’ अर्ज कसा भराल? पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर…
2. महिला बचत गटांना’मिळणार दोन लाख रुपये कर्ज! कसा कराल अर्ज, जाणून घ्या; सविस्तर माहिती…