फळधारणा कमी होण्याची कारणे:
1) पिकांना आणि पिकांमधील विशिष्ट जातींना फुले येण्यासाठी ठराविक तापमान, दिवसाची लांबी किंवा सूर्यप्रकाशाचे तास यांची आवश्यकता असते. त्यांची पूर्तता न झाल्यास झाडांना फुले येत नाहीत आणि फळधारणा होत नाही.
2) वेलवर्गीय पिकांमध्ये नर आणि मादी फुले वेगवेगळ्या वेळी येतात. नरफुले आधी येतात आणि मादी फुले नंतर येतात. परपरागीकरण झाल्याशिवाय फळधारणा होत नाही. परपरागीकरणाचे काम मधमाशा, फुलपाखरे, वारा इत्यादी माध्यमातून होते. त्यांचा अभाव असल्यास फळधारणा कमी होते.
3) टोमॅटो, वांगी या भाजीपाला पिकांमध्ये पुंकेसर व स्त्रीकेसर परिपक्व अवस्थेत येऊन फळधारणा होण्यासाठी ठराविक तापमान आवश्यक असते. तापमान खूप कमी अथवा खूप जास्त असल्यास फळधारणा होऊ शकत नाही आणि फुलांची गळ होते.
4) कांद्याचे पिकांमध्ये बीजोत्पादनात पुंकेसर आणि स्त्रीकेसर एकाच वेळी तयार होत नाहीत. त्यामुळे या पिकांमध्ये परपरागीकरण आवश्यक असते. मधमाशांचा अभाव असल्यास आणि परपरागीकरण न झाल्यास कांद्यामध्ये बीजधारणा कमी होते.
5) फुले व फळधारणा होताना मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्यांची आणि पाण्याची आवश्यकता असते. याची कमतरता असल्यास फुलांची, फळांची गळ होते आणि फळधारणा होत नाही.
6) परपरागीकरण घडवून आणणार्या मधमाशांना अपायकारक ठरतील अशी किटकनाशके पिकावर फवारल्यास मधमाशांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे परपरागीकरण कमी होते. अधिक तापमानात मधमाशांची कार्यशक्ती घटते आणि त्याचा अनिष्ट परिणाम फळधारणेवर होतो.
7) परपरागीकरणामार्फत फळधारणा होणार्या भाजीपाला पिकांवर भुकटी स्वरूपातील किटकनाशकांचा वापर केल्यास पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचा संपर्क येण्यास अडथळा निर्माण होतो, अशा वेळी फळधारणा होऊ शकत नाही.
8) फळधारणा होण्यास आवश्यक त्या संजीवकांचे पुरेसे प्रमाण झाडात तयार झाले नसल्यास फळधारणा होत नाही आणि फुले आणि फळांची गळ होते.
9) काही किड व रोगांच्या उपद्रवामुळे फळधारणा होऊ शकत नाही.
10) फुलांची संख्या जास्त असल्यास सर्वच फुलांना व फळांना पुरेल एवढे अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता झाडांमध्ये नसल्याने काही वेळा फुले व फळे गळतात आणि काही फुलांमध्ये फळधारणा होत नाही.
11) अयोग्य रसायनांचा पिकावर वापर केल्याने किंवा काही रसायनांचा अतिरेक झाल्याने किंवा त्यांचे अधिक प्रमाण वापरल्यानेही फूलगळ होऊन फळधारणा कमी होऊ शकते.
प्रा. भरत तांबोळकार
(Msc. Horticultural, NET)
…