मातीचा नमुना का घ्यावा (Why take soil sample)
जमिनीमध्ये पिकांच्या वाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची आवश्यकता आहे हे जाणून घेऊन त्या अन्नद्रव्यांचा पुरवठा जमिनीला करून पीक वाढीसाठी उत्तम आणि पोषक वातावरण तयार करण्यासाठी शेतातील मातीचा नमुना घेण्याची आवश्यकता आहे.
नमुना घेताना घ्यावयाची काळजी (Care to be taken while sampling)
- 1) मातीचा नमुना घेण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे उदा. : फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत.
- 2) मातीचा नमुना पिके काढल्यानंतर परंतु नांगरणीपूर्वी घ्यावा.
- 3) पिकास रासायनिक खते दिले असल्यास तीन महिन्यांच्या आत संबंधित जमिनीतून माती नमुना घेऊ नये.
- 5) शेतामधील खते साठविण्याची जागा, कचरा टाकण्याची जागा, झाडाखालील जागा, विहिरीजवळ, पाण्याचे पाट व शेताचे बांध इत्यादी जागांमधून किंवा जवळून मातीचे नमुने घेऊ नयेत.
असा घ्या मातीचा नमुना (Take a soil sample)
1) नमुना काढण्यासाठी शेतात गेल्यानंतर प्रथम शेतीची पाहणी करावी व जमिनीच्या प्रकारानुसार शेताचे विभाग पाडावेत. हे विभाग पाडताना जमिनीची रंग, खोली, पोत, उंच-सखलपणा, पाणथळ जागा इ., बाबींचा विचार करावा. अशा प्रकारे विभागातून एक स्वतंत्र प्रातिनिधिक नमुना घ्यावा.
2) एका हेक्टरमधून 15 ते 20 ठिकाणची माती घ्यावी, मातीचा नमुना घेण्यासाठी प्रत्येक विभागात नागमोडी रेषा काढून प्रत्येक वळणावर खड्डा घ्यावा. निवडलेल्या प्रत्येक ठिकाणाच्या जागेवरील काडीकचरा, दगड इत्यादी बाजूला करावेत. प्रत्येक ठिकाणी इंग्रजी (व्ही) आकाराची हंगामी पिकासाठी 25 सें.मी., तर फळपिकासाठी 60 सें.मी. खोलीचा खड्डा घेऊन त्यातील माती बाहेर काढून खड्डा मोकळा करावा.
3) खड्ड्याच्या सर्व बाजूने सारख्या जाडीची माती वरपासून खाली पर्यंत तपासून, ती स्वच्छ घमेल्यात गोळा करून गोणपाटावर ठेवावी.
4) अशा तर्हेने प्रत्येक खुणेजवळ खड्डे घेऊन एका शेतातून गोळा केलेली माती चांगली एकत्र मिसळावी, तिचे सारखे चार भाग करावेत. समोरासमोरचे दोन भाग वगळून उरलेले दोन भाग पुन्हा एकत्र मिसळून, त्याचे चार भाग करावेत आणि पुन्हा समोरासमोरचे दोन भाग वगळावेत.
5) अशा तर्हेने शेवटी दोन ओंजळी किंवा अर्धा किलोग्रॅम माती शिल्लक उरेपर्यंत असे करावे. मातीच्या नमुन्यासोबत शेतकऱ्याचे नाव, गाव, जिल्हा, सर्व्हे नंबर/ गट नंबर व पुढील हंगामात घ्यावयाचे पीक याबाबत सविस्तर माहिती लिहून मातीपरीक्षण प्रयोगशाळेत पाठवावी.
मातीच्या नमुन्यासोबत पाठवायची माहिती (Information to be sent along with the soil sample)
- १. *शेतकऱ्यांचे नाव व संपूर्ण पत्ता*
- २. सर्वे नंबर / शेताचे नाव
- ३. शेत क्षेत्र
- ४. जमिनीचा प्रकार
- ५. जमिनीचा रंग
- ६. जमिनीचा उतारा
पिकाच्या वाढीसाठी आवश्यक घटक(Essential elements for crop growth)
मुख्य अन्न घटक
१ नत्र २. स्फुरद ३. पालाश
दुय्यम अन्न घटक
१. कॅल्शियम २. मॅग्नेशियम ३. सल्फर
सूक्ष्म अन्न घटक
१. आयर्न २. मॅगनीज ३. बोरॉन ४. कॉपर ५. मोलिबडीनम६. क्लोरीन
हवेतून मिळणारे घटक
१. कार्बन २. हायड्रोजन
पाण्यातून मिळणारे घटक
१. ऑक्सिजन
💁 – लबडे अश्विनी बापूसाहेब
(वनस्पती पोषण तज्ञ)