Grand Coalition Govt | महायुतीच्या मोठ्या घोषणा! लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये; तर शेतकऱ्यांना 15 हजार रुपये, पाहा सविस्तर
Grand Coalition Govt | कोल्हापूर येथे आयोजित एका भव्य सभेत महायुतीने आपला दहासूत्री जाहीरनामा जाहीर केला. ‘केलंय काम भारी आता पुढची तयारी’ या नाऱ्याखाली सादर केलेल्या या जाहीरनाम्यात महिला, शेतकरी आणि वृद्धांच्या कल्याणावर विशेष भर देण्यात आला आहे. महायुतीने (Grand Coalition Govt) महिलांना सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘लाडकी बहीण’ योजनेतून देण्यात येणारी रक्कम वाढवून २१०० रुपये करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी २५ हजार महिलांना पोलीस दलात समाविष्ट करण्याचे महत्वाचे वचन देण्यात आले आहे.
महायुतीच्या मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी महायुतीने कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला १५ हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, प्रत्येक गरीब कुटुंबाला अन्न आणि निवारा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
वृद्धांच्या कल्याणासाठी वृद्ध पेन्शन धारकांना मिळणारी रक्कम वाढवून २१०० रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही जाहीरनाम्यात म्हटले आहे.
रोजगार निर्मिती आणि युवकांच्या भविष्याची चिंता करून महायुतीने २५ लाख नवे रोजगार निर्माण करण्याचे वचन दिले आहे. तसेच, १० लाख विद्यार्थ्यांना १० हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली आहे.
ग्रामीण भागातील विकासासाठी ४५ हजार गावांमध्ये पाणंद रस्ते बांधण्याचे महत्वाचे वचन देण्यात आले आहे. याशिवाय, अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला १५ हजार रुपये वेतन देण्यासोबतच त्यांच्या सुरक्षेची हमी देण्यात येईल.
ऊर्जा क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी वीज बिलात ३०% कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय, सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन देण्यात आले आहे.
महायुतीने सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र @२०२९’ नावाचा एक विस्तृत विकास आराखडा १०० दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन दिले आहे.
या दहासूत्री जाहीरनाम्यातून महायुतीने महिला, शेतकरी, वृद्ध, युवक आणि ग्रामीण भागातील लोकांच्या ,समस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. या जाहीरनाम्यातील घोषणांची अंमलबजावणी झाली तर महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास महायुतीने व्यक्त केला आहे.
हेही वाचा:
• शेतकऱ्यांनो लक्ष द्या! सरकारने PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे बदलले नियम; नवी नियमावली जारी