बदलत्या हवामानामुळे पिकावरील किडी व रोगाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे किडनाशके फवारणीचा खर्च वाढत आहे.पाऊस, सूर्यप्रकाश, तापमान, सकाळची आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता, ढगाळ हवामान, धुके या सर्व बाबी हवामान बदलाशी निगडीत आहेत बदलत्या हवामानामुळे रब्बी पिकांवर येणाऱ्या किडी व रोगाचे नियंत्रण यावर अधिक प्रकाश टाकू.
गहू : गहू पिकावर ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव होतो. नियंत्रणासाठी थायामिथॉक्झाम 25 डब्लुजी १ ग्राम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे पानावर दव साठून राहिल्यास तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. नियंत्रणासाठी मेंकोझेब २५ ग्राम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ज्वारी : ढगाळ वातावरणामुळे ज्वारी पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव वाढतो. मावा कीड पाने खरवडते. त्यातून साखरयुक्त द्रव बाहेर येतो या चिकट द्रवावर बुरशी वाढते. त्यामुळे कडबा आणि दाण्याची प्रत खालावते. या किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट (३० ईसी) १० मिली किंवा इमिडाक्लोप्रीड(१७.८ टक्के प्रवाही) ३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हरभरा : दाट धुक्यामुळे हरभरा फुलगळ होऊ शकते. या काळात तुषार सिंचनाने पाणी दयावे किंवा फवारणी पंपाने पिकावर पाणी फवारावे त्यामुळे पानावरील धुके निघून जाईल.
करडई : करडई पिकास थंड व कोरडे हवामान मानवते. जास्त पाऊस किंवा आर्द्रता रोगास आमंत्रण देते. मावा किडीचा प्रादुर्भाव दिसताच डायमिथोएट (३० ईसी) १३ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. थंडी व आर्द्रता एकत्र आलेल्या ठिकाणी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यातील मर व पानावरील ठिपके (अल्टरनेरिया) हे आर्थिकदृष्टया महत्वाचे रोग आहेत. मर रोग हा बुरशीजन्य रोग असून,
या रोगामुळे २५ टक्के झाडे नष्ट होऊ शकतात. आम्लधर्मीय, नत्राचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीत व दमट हवामानात रोग अधिक येतो. पानांवरील ठिपके (अल्टरनेरिया) या रोगामुळे करडईच्या उत्पादनात २५ ते ६० टक्के घट येऊ शकते. हा रोग बागायती करडईत झपाट्याने पसरतो. तसेच सततचे ढगाळ व पावसाळी हवामान रोगासाठी अनुकूल असते.पानांवरील बुरशीजन्य ठीपक्याच्या रोगासाठी लक्षणे दिसताच मेंकोझेब २० ग्राम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्राम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
कांदा : कांदा हे पीक हवामानातील बदलासंधर्बात फारस संवेदनशील असल्याने खराब हवामानात कांदा पोसण्यास तसेच उच्च दर्जाचा कांदा तयार होण्यास अडसर निर्माण होऊन उत्पादनात घट होते.
करपा रोग : हा रोग हवेत असणाऱ्या ‘अल्टरनारीया पोराई’ नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाची लागण झाल्यास पानाचे शेंडे जळाल्यासारखे दिसून पानावर गडद तपकिरी किंवा जांभळ्या रंगाचे निमुळते लांबट डोळ्यासारखे आकारचे डाग दिसतात. हवेतील ९० टक्के आर्द्रता आणि तापमान २१-३० सेल्सिअस या वातावरणात करपा रोगाचा प्रसार झपाट्याने होतो .करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मेंकोझेब या बुरशीनाशकाची १० लिटर पाण्यात २५ ग्रामप्रमाणे ८- १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
सुर्यफुल : केवडा रोग– दमट वातावरणात सुर्यफुलावर पांढूरकी बुरशी वाढलेली दिसते. बुरशीची वाढ पानाच्या खालच्या बाजूवर असते. या रोगाचा प्रसार बियाण्याद्वारे, जमिनीतून तसेच हवेतून होत असतो. रोगाची लक्षणे दिसताच ४० ग्राम रीडोमिल प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी .
भुरी रोग : सुरुवातीस बुरशीची पांढरट वाढ पानावर ठीपक्याच्या स्वरुपात दिसते. दमट हवामानात ठिपक्याचा आकार वाढत जाऊन संपूर्ण पान व्यापले जाते त्यामुळे पानावर पांढरट राखाडी धूळ साचल्यासारखे दिसते. रोगाची वाढ ७० ते ८० टक्के सापेक्ष आर्द्रतेत जोमाने होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी ३०० मेश गंधकाची भुकटी हेक्टरी २० किलो या प्रमाणात पिकावर धुरळावी किंवा पाण्यात मिसळणारे गंधक २५ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
सौ. दीपाली मुटकुळे
डॉ.ज्ञानदेव मुटकुळे (कनिष्ठ किटकशास्त्रज्ञ,तेलबिया संशोधन केंद्र,लातूर)
WEB TITLE: Do so in changing weather to protect all rabi crops