21 lakh bull|खेड शेतकऱ्याची हौस! २१ लाखांचा बैल खरेदी!
21 lakh bull|खेड, पुणे: हौशेसाठी कितीही किंमत मोजायला तयार असलेले अनेक लोक आपल्यात आहेत. अशाच एका हौशेची आणि ती पूर्ण करणारा शेतकरी यांची चर्चा सध्या पुण्यातील खेड परिसरात रंगत आहे.
खेड तालुक्यातील पाचारणेवाडी येथील शेतकरी राजेंद्र पाचारणे यांनी आपल्या हौशेसाठी तब्बल २१ लाख रुपये देऊन एक बैल खरेदी केला आहे. ‘किटली’ नावाचा हा बैल इतका महाग आहे की त्याची किंमत एखाद्या आलिशान गाडीइतकीच आहे! बैलाची बातमी पसरल्यावर नागरिकांची बैलाला पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी उठवल्यानंतर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शर्यतींचे आयोजन होत आहे. त्यामुळे चांगल्या जातीचे आणि सुंदर बैल खरेदी करण्यासाठी अनेक लोक उत्सुक आहेत. यासाठी ते कितीही किंमत मोजायला तयार आहेत. सध्या राज्यात बैलगाडा शर्यतीसाठी लागणाऱ्या बैलांना मोठी मागणी आहे आणि हौशेसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत आहेत.
खेड तालुक्यातील राजेंद्र पाचारणे यांनाही बैलगाडा शर्यतीची मोठी आवड आहे आणि याच आवडीमुळे त्यांनी ‘किटली’ नावाचा बैल २१ लाख रुपये देऊन खरेदी केला आहे. तसेच, या बैलाला घरी आणताना त्याची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यामुळे पंचक्रोशीत ‘किटली’ आणि त्याच्या किंमतीची जोरदार चर्चा सुरू आहे. बैलाला पाहण्यासाठी पंचक्रोशभरातील शेकडो लोक पाचारणे यांच्या घरी गर्दी करत आहेत.
बाजारात लाखो रुपयांची उलाढाल
राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी उठवल्यानंतर जनावरांच्या बाजारात चांगल्या दिवस आले आहेत. आता विविध जिल्ह्यात होणाऱ्या बैलगाडा शर्यतीसाठी बैलांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे आणि यात पुन्हा एकदा लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. यात पाचारणेवाडी येथील शेतकऱ्याने २१ लाखांचा बैल खरेदी केल्याने राज्यात याची चर्चा जोरदारपणे होत आहे.