कृषी सल्ला

कोरोना अपडेट ( विकेंड लॉकडाऊन ) : सरकारने केली पुन्हा नवीन नियमावली पहा काय केले आहेत बदल !!

कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला.

यापुढे या आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी ब्रेक दि चेन असे संबोधण्यात येईल.

यातील कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहील याची माहिती पुढीलप्रमाणे:

👉 शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील.

👉 रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी
राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.

👉 बागा, सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकं आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते.

👉 किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे

👉 सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील.
सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा.

👉 वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद.
खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील.

👉 शासकीय कार्यालये- ५० टक्के उपस्थितीत.

👉 मनोरंजन, सलून्स बंद
मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.

👉 प्रार्थना स्थळे दर्शनार्थीसाठी बंद.

👉 उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद,पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील

👉 खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल.

👉 ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस 1000 रुपये आणि संबधीत दुकान किंवा संस्थेस 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल

👉 सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर लसीकरण पूर करावे

👉 वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे

👉 शाळा- महाविद्यालये बंद राहतील. मात्र 10 व १२ परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.

👉 उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी.आजारी कामगाराला काढता येणार नाही.

👉 5 पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करणार. तसा फलक लावणार , बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button